जिथे भाव तिथे देव
एकदा एक गरीब माणूस देवाकडे धन मागण्यासाठी गेला. आता ह्यला देव भेटणार तरी कुठे? देव तर मंदिरात राहतो म्हणून हा देवळाच्या दिशेने निघाला. मध्यरात्र झाली होती मंदिराच्या दारात पाय ठेवणार तोच देवाच्या द्वारपालाने त्याला अडवलं व एवढ्या रात्री देवळात येण्याच कारण विचारलं. त्या गरिबाने वरील कारण सांगितलं. ह्यावर द्वारपाल म्हणाला, ‘मग देवासाठी तू कोणती भेट आणलीस?’ हे ऐकून गरीब चकित झाला. ‘अहो देवालाच जर भेटवस्तू देण्याची माझी ऐपत असती तर धन मागण्यासाठी इथवर मी आलोच नसतो की’. द्वारपाल ऐकेना. ‘भेटवस्तू घेऊन ये तरच देव दर्शन देतो’ म्हणू लागला व आत जाऊ देईना. गरीब निराश झाला. त्याच रात्री त्याने राजाचे रत्नजडीत मुकुट चोराले व दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळी मंदिराच्या दाराशी आला. त्याच्या हातातील मुकुट पाहून द्वारपाल म्हणाला, “अरे आमच्या देवाकडे ह्याहून देखील सुंदर, अद्भुत रत्नांनी मढलेली अनेक मुकुट आहेत. काहीतरी अमूल्य भेटवस्तू घेऊन ये”. आता मात्र गरीबाची पुरती निराशा झाली परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळी निघाला. परंतु आजही तो पहिल्या दिवशी प्रमाणेच रिकाम्या हाताने मंदिरात गेला. त्याचे डोळे अश्रुनी भरले होते आज तो फक्त त्या देवाला भेटायला आला होता त्याची धनाची आस आता राहिलीच नव्हती. मंदिराच्या दाराशी त्याला अडवायला आज द्वारपाल नव्हता. तो मंदिरात गेला आत गाभाऱ्यात भगवंताची तेजस्वी मूर्ती उभी होती. समईच्या मिणमिणत्या प्रकाशात सुद्धा तीच तेज झळाळत होत. आपले अश्रुनी भरलेले नयन त्याने झाकले व त्या मूर्तीसमोर हात जोडले. डोळे उघडून पाहातो तर देवाचे डोळे देखील अश्रुनी डबडबले होते. देव गरिबाजवळ आला आणि त्याला आलिंगन दिले. म्हणाला, ‘‘आज कोणीतरी मला निरपेक्ष भावनेने भेटायला आलंय. आजवर जे आलेत ते केवळ आपली मागणी, अपेक्षा याचं सार्थक व्हाव ह्याच भावनेने पण तू मला भेटण्यासाठी आलास आणि तुझ्या डोळ्यातील अश्रूच माझी खरी भेट आहे’’.
आपलीही त्या गरीबासारखीच गत आहे आपल्या मागण्या अनेक असतात, अपेक्षा अनेक असतात त्या आपण दरवेळी देवाकडे मांडत असतो आणि त्या बदल्यात देवाला पैसे, बळी किंवा नवस देतो. देवानेच निर्माण केलेली ही सृष्टी, निसर्गातील प्रत्येक कणावर त्याचे अधिराज्य मग त्याच्या जवळ जाण्यासाठी त्याला भेटण्यासाठी देवाला काहीतरी देण्याची गरजच ती काय ? एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देण म्हणजे व्यवहारच झाला. आणि तोच व्यवहार आपण त्या देवाशीही करतो.
एकदा नारद देवाला म्हणाले, “देवा आपला तो एक भक्त जो नेहमी रडून रडून आपलं मागण तुझ्याकडे मागतो व तू ते लगेच पूर्ण करतोस, परंतु आपला जो दुसरा भक्त तो नेहमी तुमच गुणगान करतो, साऱ्या जगताच्या आनंदाकरिता प्रार्थना करतो. पण त्याला तुम्ही काहीच नाही देत. अस का ?’’ ह्यावर भगवंत म्हणाले, ‘’नारदा अरे तो पहिला भक्त लहान बाळाप्रमाणे आहे जो आपले मागणे पूर्ण करण्यासाठी लहान बाळ जसे रडतं ना तसाच रडते. मग त्याचं रडणं कोण ऐकेल ? म्हणून ते थांबवण्यासाठी देऊन टाकतो आपण त्याला हवी असेल ती गोष्ट. तरीही त्याच्या गरजा भागतच नाहीत. पण हा जो दुसरा भक्त आहे तो मनाने थोर आहे, सहनशील आहे; त्याने माझ स्वरूप जाणलेल आहे आणि असेच भक्त माझ्या हृदयात वसतात.
‘’देव भावाचा भूकेला, नाही सुवर्णाचा’’
त्याला केवळ निर्मळ मनाने एकदाच हाक मारली तरी तो येतो आणि जर कलुषित मनाने हजारदा त्याचा धावा केला तरी तो येत नाही. त्याच्या ठिकाणी जात, काळा-गोरा, गरीब-श्रीमंत असा भेद मुळीच नाही. संत एकनाथानाही तो प्रसन्न झाला व त्याच प्रमाणे कान्होपात्रेलाही त्याने दर्शन दिले. तो तर प्रत्येक माणसात वसलेला आहे. माणसाला देवत्व प्राप्त होणं म्हणजे नक्की काय? हेमलकसा सारख्या दुर्गम भागात आदिवासी लोकांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झुगारून देणारे आमटे दांपत्य देव आहेत;अनाथांच्या ‘माय’ बनून त्याचं दुःख पदरात घेणाऱ्या सिंधुताई सपकाळ देव आहेत. खर तर माणसातील देवा बद्दलची उदाहरणे द्यावीत तर अनेक आहेत. यांच्या मुळेच देव जरी दिसला नाही तरी तो भासतो. तो मनापासून इतरांची सेवा करणाऱ्यांना तो दिसतो. कारण तो भावाचा भुकेला आहे.
समाप्त
सुंदर लेख भक्ती
ReplyDeleteMasta Asach lihit raha
ReplyDeleteGud one
ReplyDeleteखरी कथा आहे, लोकांया खुप मागण्या असतात. पण देवाची भाव ओतून सेवा करायला विसरतात. देवाच्या चरणी काही अर्पण केलं तर स्वतःचं नाव आवर्जून टाकतात. आणि मग निर्माण होतो तो 'अहंभाव' मी केलं. मी दिलं... म्हणजेच काही लोकं दान करण्यात सुद्धा स्वतःचा स्वार्थ पाहतात. ही लिहीलेली कथा अप्रतिम आहे. किमान इथुन तरी लोकांनी बोध घ्यायला हवा.
ReplyDelete-- Abhishek ashtikar
धन्यवाद 😊
ReplyDeleteखूप छान लिहले आहेस
ReplyDelete