Sunday, May 13, 2018

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी ?

Image result for students exams



आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी ?



कसे जगावे कसे मरावे विचारते हे केविलवाणे मन |
कलियुगात जगण्यासाठी हवे आहे शिक्षण आणि धन |
आजच्या एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान, राहणीमान व सर्वसामान्य जीवनात इतक्या जलद गतीने बदल घडत आहेत की दैनंदिन जीवानाच्या  गरजा  भागवण्यासाठी, त्या मिळवण्यासाठी माणसाकडे  शिक्षण व धन ह्या दोन गोष्टी असणे अत्यंत आवश्यक झाले आहे .  ह्यापैकी शिक्षण या  अंगाचा विचार करता आजचे शिक्षण हे किती वस्तुनिष्ठ झाले आहे हे कळते. कमीत कमी कष्टात जास्त नफा कसा होईल हा  ह्यामागचा विचार ; परंतु विद्यार्थ्यांची शिक्षणा बाबत धावपळ पाहता आजच्या घडीला ज्ञानार्जनापेक्षा परीक्षेत भरघोस “मार्क्स” मिळवण्यावर त्यांचा भर अधिक आहे असे दिसून येते. ह्या परिस्थिती वरून असे वाटते की खरेच आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी आहे की परीक्षार्थी ? 
विद्या + अर्थी  म्हणजेच विद्यार्थी; अशी विद्यार्थी ह्या शब्दाची व्याख्या केली जाते. जो विद्या आत्मसात करतो ,ज्ञानार्जन करतो व त्यातून आपला सर्वांगीण विकास साधतो, स्वतःचे विचार परिपक्व करण्यासाठी शिक्षण घेतो तो विद्यार्थी. ज्ञानार्जन करण्यासाठी वयाचे बंधन नसते म्हणूनच विनोबा भावे यांच्या  मते माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो. परंतु जरी एवढी सगळी व्याख्या आपण विद्यार्थ्यासाठी वापरल्या असल्या तरीही आज एकविसाव्या शतकात विद्यार्थी जगतात डोकावून पाहता आपल्याला केवळ ‘विद्यार्थी’ म्हणून वावरणारे ‘मार्क्स’ च्या मागे धावणारे बरेच ‘मार्क्सवादी’ आढळतात. अर्थात त्याला अपवाद देखील आहेच.  परिक्षेच आणि स्पर्धेच जाळहि एवढ मोठ आहे की ह्या स्पर्धेत ठीकून राहायचं असेल तर परीक्षेत आपल नाणं वाजावावच लागत आणि ह्या विचारातूनच विद्यार्थी केवळ परीक्षेपुराताच शिकतो.शिक्षण घेऊन केवळ परीक्षेत गुण मिळविण्यासाठी तयार व्हावे व परीक्षेनंतर त्या शिक्षणाला विसरावे असा चुकीचा  व भाकड विचार करून आजचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनत आहेत. परंतु मूलतः परीक्षा म्हणजे काय? ही संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे .
यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते                    विघर्षणच्छेदनपताडनै: ||
तथा चतुर्भि: मनुष्यं परीक्ष्यते                  ज्ञानेन शीलेन गुणेन कर्मणा ||
 वरील सुभाषितात सुभाषितकाराने म्हटलंय की सोन्याला त्याचातले गुण झळकवण्यासाठी आगीत तापावे लागते , घासावे लागते,ठोकून घ्यावे लागते ह्या सर्व प्रक्रीये नंतर त्यातून मग सुंदर दागिना तयार होते त्याच प्रमाणे विद्यार्थ्याने अत्मसात केलेल्या ज्ञानाची व विद्येची व ते ज्ञान कितपत खरे आहे व योग्य आहे?, त्याचे शील, गुण याची चाचणी  परीक्षांतून घेतली जाते व त्यातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडत असते व तो त्या ज्ञानला आपल्या पूर्ण आयुष्यात योग्य रित्या उपयोगात आणण्यास सक्षम होतो.  परंतु आता मात्र परीक्षेत चार पानी उत्तरपत्रिके वर निळ्या शाईत खरवडून मग त्यावरून मिळणाऱ्या मार्क्स वरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, गुणाची पारख केली जाते. ह्या अशा विद्यार्थ्याच्या दशे मागे केवळ त्याचा एकट्याचाच दोष नसून आजची शिक्षण पध्दती , शिक्षण संस्था व किबहुना पालक व समाज देखील कारणीभूत आहेत हे जाणवते. पूर्वी भारतीय गुरुकुल शिक्षण पध्दती मध्ये शिष्य ज्ञान प्राप्ती करता पूर्ण शैक्षणिक वर्ष  गुरूगृही  राहून घालावीत असे . ह्या मधल्या काळात गुरु त्याला शास्त्रीय शिक्षा देत असतानाच त्या बरोबर व्यावहारिक जीवनात उपयुक्त अशी विद्या देखील देत असतो आणि ह्या सर्वांची वेळो-वेळी, रोजच्या व्यावहारिक जीवनातून ,आचरणातून गुरु त्या शिष्याची परीक्षा घ्यायचा त्याकरता कोणतीही वेगळी औपचारिक पाठ्यक्रम ,परीक्षा अशी नसायची. झालेल्या चुकांची जणीव व त्यात सुधारणा वेळीच व्हायची व ह्यातूनच एक ज्ञानी [विद्यार्थी] शिष्याचे आयुष्य घडायचे. शिष्य केवळ परीक्षे पुरता नव्हे तर आयुष्यातील कोणत्याही प्रसंगांना तोंड देण्यास तयार व्हायचा. पण आता ह्या सर्व गोष्टींपेक्षा विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावरच्या ‘मार्क्स’ ना  अति महत्व प्राप्त झालय. पालकांना मुलाने शाळेत शिकवलेल्या पाठ्यक्रातून तो काय शिकला ह्या पेक्षा त्यातील कोणते प्रश्न महत्वाचे आहेत व ते परीक्षेला येतील ह्यावर भर देणे महत्वाचे वाटते ;त्यातच मुलाने जर घरी जिज्ञासूपणे ‘परीक्षेला महत्वाचा नसलेल्या विषयाबाबत’ विचारलेच तर त्यावर पालकांचा प्रश्न की ‘हे येणार का परीक्षेत ?’ आणि शाळेत काही ह्याहून वेगळी स्थिती नसते ‘हे परीक्षेकारता महत्वाच नाही आहे त्याचा अभ्यास करू नका ‘ अशी उत्तरे बहुतेक वेळा खुद्द शिक्षकांकडूनच मिळतात. ह्या मुले विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी कसा बनत चालला आहे हेच निदर्शनास येते.
आपल्या भारतीय थोर  व्याक्तीमत्वांकडे पाहता ते ज्ञानार्थी होते का आहेत हे आपणास उघड पणे दिसून येते. ज्ञान मिळविण्यासाठीची त्यांची धडपड देखील प्रशंसनीय आहे हे देखील जाणवते मग आजची युवा पिढी ह्या मार्गावरून का ढळतेय? ज्ञान हे कधीच वाया जात नाही आणि आयुष्यातील प्रत्येक वाटेवर ते उपयोगी ठरते. म्हणूनच केवळ शालेय जीवनातून सरून जाण्याकरिता, उत्तीर्ण होऊन पुढे जाण्याकरिता परीक्षेपुरता अभ्यास करून परीक्षार्थी बनणे की त्या ज्ञानाचा अभ्यास हा जीवनापयोगी व्हावा व देशाच्या उज्जवल भविष्यात त्याचा हातभार व्हावा ह्यासाठी ज्ञानार्थी बनावे ह्याचा सारासार विचार पूर्णपणे आजच्या विद्यार्थ्याकडे आहे. जर वेळीच ह्याचा विचार झाला तर आजचा  विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी हा प्रश्नच उद्भवणार नाही.



Sunday, April 8, 2018

जीवन त्यांना कळले हो !





जीवन त्यांना कळले हो !


“जीवन त्यांना कळले हो , मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहज पणाने गळाले हो”
किती सुंदर आणि माधुर्यपूर्ण रीतीने कविवर्य बा.भ.बोरकर यांनी जीवनाचे मूल्य व सार कशात दडलंय हे वरील ओळीत मांडलय.आज अनेक वर्षानंतर देखील हि कविता सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करतेय. का? तर किवितेत कवीने मांडलेली भावना,कल्पना व ह्रिदयाला भिडणाऱ्या विचारांमुळे. हि कविता म्हणजे खर तर त्यांचा गौरव आहे ज्यांनी निर्लोभी, निस्वार्थी बुद्धीने आपल पूर्ण आयुष्य दीन,दुबळे ,अपंग,अनाथ ह्यांच्यावर छत्र होऊन त्यांना साऊली देण्यात आणि स्वतः मात्र बहिष्कार,अपमान या सारख्या उन्हाचे चटके खात घालविले त्या थोरांचा गौरव म्हणजे हि कविता आहे .
 आज आपल्यातील बहुतेकांना हेच वाटत की आपण सुखी म्हणजे जग सुखी ; इतरत्र घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी शुल्लक असतात कारण त्या आपल्याशी संबंधित नसतात. आणि आपल्या दुःखाचा अवडंबर पण एवढा माजवत फिरतो की ह्याहून तुडुंब दुखात संपूर्ण आयुष्य झीझवलेली माणसे  देखील अस्तित्वात आहेत ह्याचा पूर्णपणे आपल्याला विसर पडतो. T.V  वर च्या बातम्यातून, वृत्तपत्राद्वारे आपण जेव्हा माणुसकीला काळिमा फासणारी हिंसक बातमी ऐकतो किव्हा वाचतो तेव्हा केवळ चारचौगात त्याबद्दलची आपली पोकळ प्रतिक्रिया देणे आणि त्यावर टीका किव्हा शोक व्यक्त करून ती गोष्ट केवळ त्यापुरती मर्यादित ठेवून आपल्या आयुष्यात पुन्हा रमून जाणे एवढेच आपणाला जमते ह्याला अपवाद देखील आहेच काही बिनसरकारी  संस्था (N.G.O.s ) ह्याद्वारे दुर्घटनाग्रस्त, पूरग्रस्त लोकांना मदात करण्यासाठी खूप धडपड केली जाते. पण समाजात काही अशी माणसे देखील आहेत ज्यांना स्वतःच्या कष्टा पेक्षा दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू अतीव दुखः देतात. आणि अशी माणसे  केवळ हातावरच्या बोटांवर मोजण्या इतकीच सापडतात.
             कुष्टरोग्यांची सेवा करून त्यांच्या आयुष्याचे  आनंदवन निर्माण करणारे बाबा आमटे आणि त्यांचाच पाऊलावर पाउल ठेऊन चालणारे डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.विकास बाबा आमटे ; खर तर डॉक्टरकीची पदवी घेऊन आपला व्यवसाय थाटून ऐषोरामात आयुष्य जगणे त्यांना सहज शक्य होत, अनाथांची माता असणाऱ्या मदर तेरेसा व सिंधुताई सपकाळ ज्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा गंध देखील नाही पण सामाजिक भान आहे  , राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता व मानवतेचे साधक, समाजाकडून पराकोटीचा विरोध व बहिकाष्कार होत असताना देखील अपमान सहन करून स्त्रियांसाठी शिक्षणाची वाट मोकळी  करून देणारे  महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ...खर तर नावे  घेऊन देखील संपणार नाही एवढी मोठी यादी ह्या सर्व महात्म्यांची आहे .जशी यादी मोठी तशी त्यांची कार्ये देखील प्रशंसनीय आहे .
खर तर आपले आदर्श हे चित्रपटातले नायक  किंवा नायिका नसून हि लोक आहेत जी इतरांसाठी जगतात आणि इतारांसाठी मारतात. ‘ मरावे परी किर्तीरूपे उरावे’ हि उक्ती ह्यांना शोभते. आणि म्हणूनच जरी जगात हिंसक, मारक व वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ जरी झाली तरीही ह्या महात्म्यांच्या अस्तित्वामुळेच जगण्याची अशा मिळते व काही चांगल करण्याची प्रेरणा मिळते.